ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकता यावा, यासाठी पणन विभाग आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'थेट शेतकरी ते ग्राहक' योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत आठवडी बाजार भरवले जातात. सध्या राज्यात ११६ ठिकाणी असे आठवडी बाजार सुरू आहेत. यामध्ये पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ६६, मुंबईत १८, नवी मुंबईत ७, ठाण्यात ११, नागपुरात ६, सोलापुरात ३, औरंगाबादमध्ये ३, वर्ध्यात १ आणि परभणीत १ बाजार आहेत. या बाजारांमध्ये दर आठवड्याला सुमारे ४१,००० मे. टन शेतमालाची विक्री होते आणि सुमारे ₹२०५ कोटींची उलाढाल होते. या बाजारात शेतकरी स्वतः आपल्या मालाची किंमत ठरवू शकतो. ग्राहकाने दिलेले पैसे थेट शेतकऱ्याला मिळतात. त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या मालाचा योग्य भाव मिळण्यास मदत होते.