बातमी
यंदा ५० हजार वऱ्हाडींच्या भोजनाची व्यवस्था; लोकमंगलचा १३ डिसेंबरला ४९ वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा!

लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ४९ वा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा रविवार, दि. १३ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर हरीभाई देवकरण प्रशाला येथे संपन्न होणार आहे. यंदाच्या सोहळ्यात तब्बल ५० हजार वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती शशी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूरसह धाराशिव, बीबीदारफळ आणि बोरूळ येथे सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. हा उपक्रम अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोलापूर आणि धाराशिव परिसरात १०० हून अधिक माहिती केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक वधू-वरांनी विवाहासाठी आ. सुभाष देशमुख यांच्या होटगी रोडवरील संपर्क कार्यालयात (मारुती सुझुकी शोरूमच्या मागे) नावनोंदणी करावी.
या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवदांपत्यांना विवाहासाठी आवश्यक कपडे, दागिने आणि संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे. यामध्ये वधूसाठी शालू, हळदीची साडी आणि चप्पल, वरासाठी सफारी, हळदीचे कपडे आणि बूट, तसेच मामाचा आहेर, मणी-मंगळसूत्र आणि जोडवे यांचा समावेश आहे. याशिवाय ताट, वाटी, ग्लास, स्टीलचा हंडा, डबा, तांब्या आदी संसारोपयोगी वस्तूही भेट देण्यात येणार आहेत. वधू-वरांसाठी स्वतंत्र मेकअपची व्यवस्था करण्यात आली असून, नवदांपत्यांची शाही बग्गीतून वरात काढण्यात येणार आहे.
३ हजार २२१ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या संपन्न
लोकमंगल फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण ३ हजार २२१ जोडप्यांचे विवाह यशस्वीरीत्या संपन्न झाले आहेत. यामध्ये हिंदू धर्मातील २ हजार ५०८, बौद्ध धर्मातील ६८१, मुस्लिम धर्मातील २१, जैन धर्मातील ७ आणि ख्रिश्चन धर्मातील ७ जोडप्यांचा समावेश आहे.
धर्म, जात आणि आर्थिक परिस्थितीचे बंधन बाजूला ठेवून सर्वसामान्य कुटुंबांवरील विवाहाचा आर्थिक भार कमी करण्याबरोबरच नवदांपत्यांना नव्या संसाराची सुरुवात करण्यासाठी आवश्यक मदत देणारा लोकमंगल फाउंडेशनचा हा उपक्रम सामाजिक एकोपा आणि सर्वधर्मसमभावाचा आदर्श निर्माण करत आहे.
