बातमी
लोटस योजनेतून १२ विद्यार्थ्यांना २.६४ लाखांची शिष्यवृत्ती वितरित

लोकमंगल फाउंडेशनचा शैक्षणिक उपक्रम; ११ वर्षांत २४२ विद्यार्थ्यांना ९६.५५ लाखांची आर्थिक मदत
आर्थिक परिस्थितीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण अपूर्ण राहू नये, या उद्देशाने लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लोटस (LOTUS) शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत १२ विद्यार्थ्यांना २ लाख ६४ हजार रुपयांच्या शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण करण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी लोकसंवाद साधून शैक्षणिक प्रवास, अनुभव आणि भविष्यातील उद्दिष्टांविषयी चर्चा करण्यात आली.
लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक मा. सुभाष (बापू) देशमुख यांच्या पुढाकारातून २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील गरीब, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना दिला जातो. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ एकदाच मदत न करता, त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत दरवर्षी आर्थिक सहाय्य केले जाते. त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील सातत्य टिकवून ठेवण्यास मदत होत आहे.
गेल्या ११ वर्षांत लोटस योजनेच्या माध्यमातून २४२ विद्यार्थ्यांना एकूण ९६ लाख ५५ हजार ३४० रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. या मदतीच्या बळावर अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून खासगी तसेच शासकीय क्षेत्रात विविध महत्त्वाच्या पदांवर आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीमुळे कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीतही सकारात्मक बदल घडून आला आहे.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणासाठी मिळालेल्या आर्थिक आधाराविषयी आपले अनुभव व्यक्त केले. पालकांनीही या उपक्रमामुळे मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याची भावना व्यक्त केली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लोटस योजना सातत्याने करीत आहे.
