बातमी
भीमेचे पाणी दक्षिण सोलापूरमधील शेवटच्या गावापर्यंत पोहोचलेच पाहिजे; पाणीप्रश्न सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करा!

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी अद्याप दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज-चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पोहोचलेले नाही. वडापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचल्यानंतर पुढील प्रवाह थांबल्याने कारकल, बाळगी, सादेपूर, निबर्गी, औज, कुरघोट, माळकवठे, नांदणी, टाकळी, चिंचपूर यांसह परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या गावांतील नागरिक आणि पशुधनाची पाण्याची गरज भीमा नदीवर अवलंबून आहे. अरळीपुढील भागात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांदरम्यान निर्माण झालेल्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे पाण्याचा प्रवाह अडल्याचे समोर आले आहे. मात्र, या अडचणींचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणे योग्य नाही. दोन्ही राज्यांतील समन्वयाच्या अभावामुळे दक्षिण सोलापूरमधील गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागता कामा नये.
आज टाकळी येथे नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले. नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या पाण्याची गरज रास्त आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब आहे. या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन तो मार्गी लावण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री मा. श्री. जयकुमारजी गोरे साहेब आणि जिल्हा प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महोदयांशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत योग्य तोडगा काढण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले आहे.
या प्रश्नावर तात्पुरता उपाय करण्याऐवजी पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी दूर करणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूर आणि विजापूर (विजयपूर) जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संयुक्त बैठक घेऊन दोन्ही राज्यांमधील अडथळे दूर करावेत. जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ठोस निर्णय घेऊन भीमा नदीतील पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू करावा आणि औज-चिंचपूर बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचवावे. राज्य शासनाने तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाने यासाठी तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
पिण्याचे पाणी हा नागरिकांच्या जीवनाशी निगडित मूलभूत प्रश्न आहे. प्रशासकीय अडचणी, तांत्रिक कारणे किंवा दोन राज्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागता कामा नये. नागरिकांची तहान आणि पशुधनाची गरज यांना सर्वोच्च प्राधान्य मिळाले पाहिजे.
दक्षिण सोलापूरमधील प्रत्येक गावाला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे. भीमेचे पाणी तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत. एकही गाव पाण्यापासून वंचित राहता कामा नये, ही ठाम भूमिका आहे.
